rajiv satav leads congress selection committee in delhi election
rajiv satav leads congress selection committee in delhi election  
विश्लेषण

कॉंग्रेसचा भोपळा फोडण्याची दिल्लीत राजीव सातव यांना जबाबदारी

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली ः दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज छाननी समितीचे नेतृत्व राजीव सातव यांच्याकडे सोपविले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील 70 जागांपैकी कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. या वेळी तो फोडण्याचे आव्हान सातव यांना पेलावे लागणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, केंद्रीय निवडणूक आयोगानेही निवडणूक तयारीचा आढावा घेतला आहे. दिल्ली विधानसभेत सध्या आम आदमी पक्षाचे एकतर्फी वर्चस्व असून, सलग पंधरा वर्षे दिल्लीत सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रेसला गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शून्य जागा मिळाल्या होत्या. तसेच, लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसची दिल्लीमध्ये कामगिरी अतिशय सुमार राहिली होती. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल सरकारला आणि केंद्रातील मोदी सरकारच्या करिष्म्याच्या जोरावर दिल्लीत सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला आव्हान देण्यासाठी कॉंग्रेसने "राहुल ब्रिगेड'मधील नेत्यांना पुढे केले आहे.

उमेदवारनिवडीसाठी कॉंग्रेसच्या छाननी समितीत राजीव सातव यांच्यासोबत बिहारचे सहप्रभारी असलेले वीरेंद्रसिंह राठोड आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी असलेले चल्ला वाम्शीचंद रेड्डी सदस्य आहेत. तिन्ही नेत्यांची पार्श्‍वभूमी युवक कॉंग्रेसची असून, सध्या गुजरातचे प्रभारी असलेले राजीव सातव हे याआधी पंजाब निवडणुकीमध्ये अशोक गेहलोत अध्यक्षतेखालील छाननी समितीचे सदस्य राहिले आहेत. 

याव्यतिरिक्त या छाननी समितीमध्ये कॉंग्रेसचे दिल्ली प्रभारी पी. सी. चाको, सहप्रभारी कुलजित नागरा, प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा हेही असतील.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT